विद्यापीठाविषयी...
१९ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात रिद्धपूर (अमरावती) येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंबंधीचे बिल मंजूर करण्यात आले आणि महाराष्ट्राच्या भाषावैभवात एक महत्त्वाचा शिरपेच रोवला गेला. दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी भाषा विद्यापीठ कार्यरत झाले. ज्या रिद्धपूर नगरीत मराठी भाषेतील साहित्याच्या निर्मितीचा पाया रचला गेला आणि तिला धर्मभाषा व ज्ञानभाषेचे स्थान दिले, त्याच रिद्धपूर नगरीत मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देणे हा औचित्याचा भाग ठरावा.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन आणि संशोधन हा विद्यापीठाच्या निर्मितीचा मूळ हेतू आहे. मराठी भाषा विद्यापीठ या दृष्टीनेच आपली वाटचाल करीत आहे.
मराठी भाषा विद्यापीठाचे संकल्प
- स्वभाषाभिमान जागवणे, मराठी भाषेचे महत्त्व पटवून देणे.
- मराठी भाषेतून रोजगार क्षमता विकसित करण्यास प्राधान्य देणे.
- ज्ञानभाषा म्हणून मराठी भाषेचे सामर्थ्य व कौशल्य अधोरेखित करणे.
- सर्व विषयांचे अध्यापन मराठी भाषेतून करणे.
- विविध विषयांतील ज्ञान मराठी भाषेतून समाजापर्यंत पोहोचविणे.
- सर्व ज्ञानशाखेतील प्रत्येक अभ्यासक्रमात मराठी भाषेची अभ्यासपत्रिका अनिवार्य राहील. इतर विद्यापीठांसाठीही या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
- दैनंदिन जीवनात मराठी भाषेच्या वापरासाठी समाजाला प्रोत्साहित करणे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ज्ञानशाखांच्या अभ्यासक्रमांची मराठीत भाषांतरे करणे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमराठी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांसाठी मराठी भाषेच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
- मराठी भाषेची अभिव्यक्तीक्षमता वाढविण्यासाठी पायाभूत संसाधनांची निर्मिती करणे.
- सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीसाठी भाषा व साहित्याचे महत्त्व विशद करणे.
- अभिजात मराठी भाषा केंद्रवर्ती ठेवून मराठी भाषा व साहित्याचे संशोधन करणे.
- मराठी भाषा व साहित्य संशोधनाला गती देण्यासाठी संशोधन पत्रिका चालविणे.
- जुन्या संशोधकांच्या मुशीतून नवसंशोधकांची पिढी तयार करणे.
- मराठी भाषिक क्षमताधिष्ठित प्रशिक्षणाद्वारे व्यावसायिक कौशल्ये निर्माण करणे.
- मराठीतून प्रमाणित व सुलभ प्रशासकीय कामकाज चालावे म्हणून प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवणे.
- मराठी माध्यमाच्या शाळा व मराठी माध्यमांच्या शाळांविषयी जनजागृती करणे.
- देश-विदेशातील संशोधकांना मराठी भाषा व साहित्य संशोधनाविषयी प्रेरित करणे.
- परदेशी मराठी शाळांना मराठी भाषा विद्यापीठाशी जोडणे.
- परदेशातील मराठी भाषकांसाठी मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक्रम तयार करणे.
- अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करणे.
- विविध बोलींचे संरक्षण, संवर्धन आणि संशोधन करणे.
- विविध अभ्यासक्रमात बोलीतील साहित्याचा समावेश करणे.
- भाषा संशोधनाबरोबरच सांस्कृतिक चळवळीचे संशोधन करणे.